Thursday, May 19, 2011

चिंचेच झाड

माझ्या छोट्याश्या शाळेच्या छोट्याश्या ग्राउंडवर एक मोठ असं चिंचेच झाड होत. त्याचा पसारा बराच मोठा होता. ग्राउंडवर पडणाऱ्या सावलीमध्ये त्याचा वाटा मोठा असे. त्याचे खोड इतके मोठे होते की त्याला मिठी मारायची झाली तर तीघाचौघांना एकमेकांचे हात पकडून त्या भोवती उभे राहावं लागे. शाळेच्या मागच्याबाजूला बरीच झाडं होती. पण हे समोर असल्यामुळे ते सगळ्यांचे लाडके होते. जेव्हा झाडाला चिंच लागण्याचा हंगाम असायचा त्यावेळी सगळी मुलं त्यावर तटून पडलेली असायची. घरातून येताना कागदात मीठ बांधून आणायचे आणि मधल्यासुट्टीत चवीने चिंचा पाडून खायच्या हा कर्यक्रम ठरलेला असायचा. पूर्ण मधल्यासुट्टी चिंचा पाडण्यात जायची. सुट्टीची घंटा होताच पहिला दगड हातात घेऊन सुरु झालेला हा खेळ शेवटच्या घंटेपर्यंत चालायचा. आमच्या शाळेतल्या पाचसहा तासांचा जो काही वेळ असायचा त्यातला थोडातरी वेळ या झाडापाशी जायचा.

माझ्या वर्गात प्रसाद चव्हाण नावाचा माझा मित्र होता. माझ्यामते आमच्या सगळ्यांपैकी जास्त वेळ त्या झाडापाशी घालवला असेल तो प्रसादने. झाडावर दगडमारून चिंच पाडण्यात तो जामच माहीर होता. ते झाडं नसत तर प्रसादाचा बराचसा वेळ असाच वाया गेला असता. ते झाडं आणि प्रसाद एक वेगळाच समीकरण झालं होत जे आमच्या गणिताच्या सरानाही सोडवता आलं नसतं. चिंचेची कोवळी पानेसुधा खायला गोड लागतात, त्यामुळे चिंचा पडतांना पडलेली पानेहि खाल्ली जायची. चिंच खाल्ली की नंतर त्यातली चिंचुकाही भाजून खाल्ली जायची. पावसाळ्यात तर त्याच्या खालची बरीचशी जमीन कोरडीच रहायची त्यावरून त्याच्या विस्ताराची कल्पना येईल. त्या झाडाच्या चिंचेच तर मुलांना व्यसनच लागल होत. शाळेच्या वेळात शिक्षकांच्या भीतीने मुलांना झाडावर चढता येत नसे. त्यासाठी मुलं रविवारची सुट्टी साधत. तसं तर हे झाड वेगवेगळ्या तह्रेने आमच्या बरोबर असायचे. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे खाण्याचा दृष्टीने तर होताच, बाकी आम्ही खेळण्यासाठी मैदानात असायचो तेव्हा ते आमच्यापैकीच एक असायचे. सोनसाखळी खेळताना एखादा झाडामागे गेला की त्याला पकडणे कठीणच. सोनसाखळीचा तो वेढा पकडण्यासाठी आला की झाडामुळे त्यांना एकमेकांचे हात सोडावे लागत, आणि तीच वेळ साधून पाळायला मिळत असे. लपाचुपी खेळताना लपण्याची ती एक चांगली जागा होती. शाळेचे स्पोर्ट्स असले की त्याच झाडाखाली बसण्यासाठी गर्दी होत असे. क्रिकेट खेळतानासुधा झाडाच्या सावलीत फिल्डिंग करण्यासाठी आमची भांडण होत असत. पतंगाच्या मोसमात बरेचशे पतंग झाडावर अडकलेले असायचे. चिंच काढायला झाडावर चढलो की पतंगाची सुधा कमाई होत असे. शाळेच्या सगळ्याच मजल्यांवरून आणि सगळ्याच वर्गातून ते झाड दिसायचे झाडावर झालेली थोडीशीही हालचाल लगेचच लक्ष वेधून घ्यायची, असेच एकदा हिंदीच्या तासाला वर्गात असताना बाहेर झाडावर चढलेल्या एका मुलामुळे माझं सार लक्ष तिकडेच केंदित झाल होत. नावाला मी वर्गात बसलो होतो आणि ते आमच्या शिक्षिकेलाहि कळले होते. मग काय बाकीच्या उरलेला तास उभा राहूनच गेला.

आमची जवळ जवळ ११ वर्षे त्या झाडाच्या सानिध्यात गेली. माझे आई बाबा जवळचे नातेवाईक व काही जवळचे मित्र सोडले तर मला जास्त ओळखणारे ते झाड होते. १९९९ सुमार, ५ नोव्हेंबर पासून दिवाळीची सुट्टी लागणार होती. कुणी गावाला, कुणी मामाकडे तर कुणी बाहेर फिरायला प्रत्येकाचा वेगवेगळे प्लान होता. शाळा सुटली होती, सगळेच तोंडावर आलेली दिवाळीची सुट्टी अनुभवायला आसुसलेले होते.

दिवाळीचे वीस पंचवीस दिवस अगदी मजेत गेले. सुट्टीनंतरचा पहिला दिवस उजाडला होता. माझ्या घरातून शाळा दिसत असे, मैदानात एकाच गर्दी झाली होती. सहसा प्रत्येकजण आपापल्या वर्गाबाहेर उभे राहत पण आज मैदानात गर्दी का हे जाणण्यासाठी मीही उत्सुक होतो. सगळे मित्र भेटणार ह्या विचाराने मी धावतच मैदानात आलो. मी जसा मैदानात गेटजवळ आलो तो तसाच जागीच उभा राहिलो, काहीतरी हरवलं होत शाळेचा आवार मोकळा आणि भकास वाटत होता. वास्तव कळायला मिनिटभर लागला पण जेव्हा कळलं तेव्हा तो क्षण मनात व हृदयात धडकी भरवणारा होता. शाळेची सावली लोप पावली होती, लपाचुपी खेळतानाची माझी लपण्याची आवडती जागा हरवली होती. तासोनतास झाडाबरोबर रमणाऱ्या प्रसादाची दगड मारण्याची जागा त्याने गमावली होती. सावलीत फिल्डिंग करण्यासाठी भांडणाच कारण आता उरल नव्हत, सोनसाखळीचा तासभर चालणारा खेळ आता क्षणार्धात संपायचा. सगळ्यांचच आवडतं चिंचेच झाड तोडलं होत. खांद्यावरच दप्तर शाळेच्याच खांबाजवळ काढून ठेवत मी मुलांच्या घोळक्यात शिरलो, सगळ संपलं होत उरल होत ते फक्त जमिनीपासून एक दीड फुट वर आलेलं त्याच खोड आणि झाड तोडताना सर्वत्र उडालेले त्याचे शेकडो तुकडे. जरा वेळासाठी मला सगळाच खोट वाटत होत पण ते सगळ वास्तव होत. त्या मोकळ्या झालेल्या वातावरणातही माझी घुसमट होत होती. मी त्या घोळक्यातून बाहेर पडलो आणि माझ्या वर्गाकडे निघालो. न राहून मी ते दृश्य सारखे पहातच होतो. शाळेचा आवार आता फाटल्यासारखा वाटत होता.

त्याच दरम्यान एखाद दोन आठवड्यानंतर रोटरी क्लब तर्फे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी त्या तोडलेल्या झाडाला सगळेच विसरले होते. त्याच्या तोडलेल्या खोडाचीही अडचण झाल्याने ते खोदुन त्यावर माती टाकून ते सपाट करण्यात आले होते.


ते झाड कोणी, का व कशासाठी तोडले असे अनेक प्रश्न आपलं डोकं वर काढत होते. पण आता विचार करणे व्यर्थ होते. सुरुवातीचा एक महिना शाळेतून आत शिरताना त्या तुटलेल्या खोडाकडे माझं लक्ष हमखास जायचेच. ते झाड तोडल्यामुळे निसर्गाचा तर काही प्रमाणात नाश झालाच, पण त्याच बरोबर मुलांची मनेही तोडली गेली होती. कारण त्या झाडाची मूळ सगळ्यांच्याच मनामध्ये खोलवर रुजली होती. वर्गात बसल्यावर आता मोकळा पण खायला उठणारा परिसर दिसत असे. आता बरेच आठवडे सरले ती मला वर्गात बसल्यावर कायम एक मित्र गैरहजर असल्याचा भास होत होता. शाळेच्या हजेरीपाटावर सगळी मुलं हजर असतं पण माझ्या मनाच्या हजेरीपटावर एकजण कायम गैरहजरच होता ...........

No comments:

Post a Comment