Tuesday, July 10, 2012

शब्दांच्या पलीकडील आई..... आलो जन्माला फक्त बिछाना ओला करण्याची बुद्धी घेऊन, नऊ महिने वाहिलं माझ ओझं स्वतःला विसरून, स्वतःला हवं ते मागण्याची हुशारी मीच माझ्यात निर्माण केली, दुसऱ्याला न मागता देण्याची कला तिनेच शिकवली, वाढत होतो शरीराने पण माणूस म्हणून वाढण्यात तिचीच मेहनत आहे, रडताना शांत सगळेच करतात पण रडताना आलेल्या हसण्यात तीच आहे, दुःखाच्या ढगांची दाटी झाली कि सुखाची सर बनून यायची, कितीही बरसली तरी माझी होडी किनार्यालाही तीच आणायची, रिकाम्या ताटात तिचा चेहरा आणि रिकाम्या पोटात तिने भरवलेला घास आजही आठवतो, भरले डोळे कधी कि रुमाल सोडून तिच्या कुशीत शिरण्यास तरसतो, तिला हसताना बघून मीही मनात हसतो, नेहमी अशीच हसत राहावी हे स्वप्नं रोज बघतो, तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या कि मनात दुःखाचा पूर येतो, एकदा स्वचंदी हसली कि आपण सगळ्या व्यापातून दूर होतो, जगणं सगळेच शिकतात पण जगण्याच कारण तिने शिकवलं, किती जगावं ह्यापेक्षा कसं जगावं हे तिनेच समजावलं, सरळ रस्त्याने वाकडे चाललो कि वाकड्या रस्त्याने सरळ चालण्याची दीक्षा मिळते, तरीही तिच्या न कळत वाकड्यात शिरलो कि मग शिक्षाही मिळते, मायेचा धबधबा असकाही वाहतोय कि कधी तहान तोंडी नाही, सुखाचा मार्ग असकाही गवसलाय कि कसलीही कोंडी नाही, ती नेहमी पाठीशी असल्याची नाही तर नेहमी बरोबर असल्याची खात्री आहे, आणि ह्या एक विचारानेच माझी आणि सुखाची मैत्री आहे.

Monday, November 21, 2011

फसुबस

तसं तर ती वयाने माझ्या आजीच्या वयाची आहे. पण तीचा संबंध लहान मुलांशी जास्त येतो. लहान मुलांची तेलाने मालीश करतात त्यासाठी ती प्रसिद्ध आहे. माझीही मालीश तिनेच केली आहे. म्हणजे मी जन्मल्यापासून ती मला ओळखते. जगात खूप कमी लोक अशी असतात की ज्याचं आपल्याशी रक्ताचं नात नसतं, तरीसुद्धा ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यापैकी एक फसुबस आहे. मानलं की तिचं नाव जरा विचित्र आहे आणि मलाही तसं वाटत. पण फसुबस हे नाव कसं आलं त्यामागे तिचं मूळ नाव कारणीभूत आहे. 'फसाबाई' हे तिचं मूळ नाव. कारण जुन्या लोकांना उगाचच चांगल्या नावाची मोडतोड करून नवीन नाव ठेवण्याची सवय असते. त्यामुळे 'फसाबाई'च 'फसुबस' झालं असावं असा माझा अंदाज आहे. तीच नाव फसाबाई आहे हे मलाच बऱ्याच वर्षांनी कळले. माझ्या लहानपणापासून मी तर तिला फसुबस याच नावाने ओळखतोय.

बरीच माणसं असतात जी आपल्याला रोज दिसतात. उदा. शाळेतले शिक्षक, मित्र, शेजारी इ. पण माझ्या ह्या नावांच्या यादीत फसुबस हे नाव सुधा आहे. ती मला अगदी शाळेत असल्यापासून ते आता ऑफिसला जाणे चालू झाले तरी ती रोज दिसते. तशी ती इतर वयस्कर बायकांसारखीच आहे तरी सगळ्यात वेगळी. एकतर तीच व्यक्तिमत्त्व थोडं हटके असं. वरवर पाहिलं तर अगदी सामान्य पण नीट निरखल तर बरेच पैलू गवसतील. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे तिचा पेहराव! एकदम भारदस्त!! गडद सावळा रंग, थोडासा खरखरीत तरीसुद्धा स्पष्ट आणि कडक आवाज, दात नसल्यामूळे तोंडाचा झालेला चंबू, थोडाफार सुरकुतलेला चेहरा, नाकात नथ आणि भक्कम अशा शरीरावर काष्टा मारून नेसलेलं लुगड. तिची किंचित वाकून पण वेगात चालण्याची लबकही सगळ्यात वेगळीच. स्वभावाने तितकीच साधी, मनाने हळवी आणि काळजी घेणारी. भयंकर कष्टाळू, तरीसुधा चेहऱ्यावर कष्टाचे भाव शोधूनही सापडणार नाहीत. स्वतःसाठी तर सगळेच राबतात पण इतरांसाठी राबणारी फसुबस हि एकटीच.

एकंदरीत काय तर सगळ्यांसाठी वाहिलेल आयुष्य जगणारी फसुबस आधीपासून एकटीच राहते. माझ्या शाळेच्या बाजूलाच हाकेच्या अंतरावर तिचं घर होत. तिला एकटीला पुरेल असं छोटस कौलारू घर, बाहेरच एक लाल रंगाचा जुन्या पद्धतीचा थेंब थेंब पाणी गळणारा नळ, त्याखालीच काळ्या कड्प्प्याची तुटलेली व अर्धी मातीत रुतलेली लादी, घरात शिरताना वाकून आत जावे लागे. घरात सामानाच्या नावाखाली मातीची पण शेणाने सारवलेली सुबक अशी चूल, सहज मोजता येतील इतकी दहा वीस भांडी, कथ्यामध्ये विणलेली एक लाकडी खाट त्यावर ठिपक्यांची घरात विणलेली गोधडी, तिच्या नेहमीच्या वापरातील थोडं सामान, एक जुनाट असं कपाट आणि दोन तीन वेताच्या टोपल्या. तिच्या त्या छोट्याश्या घरातून एका चिंचेच्या झाडाने आपला संसार मांडला होता. त्याचे खोड घराच्या एका कोपऱ्यातून वर कौलातून बाहेर निघाले होते. त्या छोट्याश्या घरात तिने त्यालाहि जागा दिली होती. त्या 10x10 च्या खोलीत दिवसाही अंधारच असायचा, एक पिवळट बल्प होता खरा पण तो संध्याकाळी सात वाजल्यानंतरच लुकलुकायाचा. दिवसा उजेडासाठी कौलातून डोकावणारे दोन तीन कवडसे आणि देवघरातील दिवा. जो सतत तेवत असायचा. असं तिचं छोटस पण नीटनेटक घर. पण त्या घरात आराम करण्यासाठी तिला कधी वेळच नसायचा, कायम कुठेतरी कोणाकडेतरी तिला बोलावलं जायचं. कुणाकडे बारसं, लग्न, हळद आणि सगळ्या कामात असायची आणि महत्त्वाच म्हणजे लहान मुलांची मालिश. सतत कुठेतरी अडकलेली असायची. पण ती न चुकता दिसायची अशी जागा म्हणजे माझी शाळा. शाळेतल्या मैदानाच्या एका कोपऱ्यावर बसून ती चिंच, हळद मिठात उखडलेल्या भुईमुगाच्या शेंगा आणि बोर विकायची. सगळी मुलंदेखील रोज रोज घरच आणि शाळेत मिळणाऱ्या जेवणाला कंटाळून त्या चटपटीत खाण्यासाठी तिच्याभोवती गर्दी करायची. ती भरलेली टोपली रिकामी व्हायला काही मिनिटांचा अवधी लागायचा. तसं तर ती माझ्या आजीला चांगली ओळखायची, आणि आमच्या घरीही बऱ्याचदा यायची. त्यामुळे शाळेतही इतक्या मुलांच्या गर्दीतही ती मला सहज ओळखायची. जर कधी मी पैसे देऊन काही घ्यायला गेलो कि ती पैसे न घेताच मुठभर बोर नाहीतर चिंच माझ्या हातावर टेकवायची आणि माझे सगळे मित्र आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहायचे. मी खुपदा प्रयत्नही केला पैसे देण्याचा पण काहीच उपयोग नव्हता. त्यानंतर मी मित्रांकडे पैसे देऊन तिच्याकडून चिंच किंवा शेंगा विकत घ्यायचो. असंच एकदा शाळा सुटल्यावर ती मला रस्त्यात भेटली होती. तिच्या हातात टोपली तर दिसत नव्हती, पण तिच्या साडीमध्ये थोडफार समान राहील असा एक कप्पा बनलेला असायचा. त्या कप्प्याला जुनी लोकं "ओटी" असं म्हणतात. त्यातून तिन मला चार पाच चिंच काढून दिल्या. मी काही बोलायच्या आधीच "घे घे..... खाऊ घे...." असं बोलून गोड हसली. ती असं जपून ठेवलेला खाऊ वाटून तिला काय मिळत असेल याचा विचार मी अजूनही करतोय. हल्लीचीच गोष्ट आहे, ऑफिसला जात असताना सकाळीच ती समोरून चालत येताना मला दिसली. मला पाहून ती थांबली आणि तिचा हात साडीच्या कप्प्याकडे गेला आणि मला जे समजायचे होते ते मी समजलो. तिने दोन पेढे काढून माझ्या हातावर ठेवले आणि तशीच गोड हसली!! जरा वेळासाठी मला पुन्हा शाळेत असल्याचा भास झाला. इतक्या वर्षानंतरही ती जराही बदलली नव्हती.

मुलांप्रमाणे शाळेतल्या शिक्षकांनाही शेंगा आणि चिंचेची चटक लागली होती. कोणीतरी सरांना सांगितले होते कि ती आजी सुनितला ओळखते म्हणून. तेव्हा सरांच्या सांगण्यावरून मी आणि मित्र तिच्याकडे शेंगा आणायला गेलो होतो. तेव्हा तीने नेहमीप्रमाणे पैसे न घेताच मुठभर बोर माझ्या हातात दिली. इकडे मित्राच्या तोंडाला पाणी सुटलं होत आणि मी म्हणालो "नको नको.... बोर वैगरे नको..." आमच्या सरांना शेंगा हव्या आहेत. तिला खरे वाटेना!! "मी पैसे नाही घेत म्हणून नाही घेत न बोर" ती म्हणाली. माझा मित्रही तिला समजावत होता "अहो आजी खरोखर आमच्या सरांनाच शेंगा हव्या आहेत". पण सुनितला दिलेली बोर फ्री असतील तर तीही चालतील. माझा मित्र वाटेल ते बडबडत होता. शेवटी तिची समजूत काढल्यानंतर तिने पैसे घेऊन शेंगा दिल्या खऱ्या पण हातात भरलेली बोर परत घ्यायला ती काही तयार नव्हती आणि ती भरलेली मुठ आवळून मी तसाच शाळेत परतलो. मागे वळून बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर तिचं ते गोड हास्य उमटलं होत आणि मीही ती मनातून आनंदित झालो होतो.

घरातल्या जवळ जवळ सगळ्याचा कार्यक्रमांना फसूबसची हजेरी असतेच. हजेरी असते बोलण्यापेक्षा तिला हक्काने बोलावले जाते. बरीचशी महत्त्वाची कामे तिच्या हातूनच होतात. लहान मुल जन्मल्यानंतर पाच दिवसांनी त्याला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम असतो त्याला "पाचवी" असं म्हणतात. त्यादिवशी तांदळाच्या पिठाची आणि गुळाची एक डिश बनवली जाते. तसं तर ही डिश बनायला एकदम सोपी पण खूप चविष्ट असते आणि त्यात फसूबसने बनवली असेल तर त्याची चव काही औरच असते. मी तर तिने बनवलेली ही डिश खाण्यासाठी म्हणूनच ह्या कार्यक्रमाला हजेरी लावायचो बाकी कार्यक्रमात नक्की काय होत ते अजूनही मला माहिती नाही. असाच एक पदार्थ जो लग्नकार्यात बनवला जातो तो म्हणजे "पोळा' आणि "पापडी". हे सगळे बनवण्याची जिम्मेदारी तिचीच असते आणि ह्या सगळ्या गोष्टींची नाळ थेट फसूबसशी जोडली जाते. ती नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी मलातरी अर्धवट असल्यासारख्या वाटतात. लग्नघरात तर फसूबसच्या नावाचा नुसता जपच चालू असतो.

तिच्या असंख्य आठवणी सांगता येतील. पण त्यातल्या त्यात माझ्या चांगल्या लक्षात राहिलेल्या एकदोन गमतीदार आठवणी.

माझ्या बिल्डींच्या समोरच्या मैदानात आमचा क्रिकेटचा खेळ रंगायचा. असंच एकदा आमचा खेळ सॉलिड रंगला होता. आमच्यापैकी एका तेंडुलकरने जोरदार बॉल मारला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या फसूबसला लागला. तो तिला मजबूत जोरात लागला असावा कारण लागल्यानंतर ती अशीकाही वैतागली की रागाच्या भरात तिने जोरजोरात बडबडायला सुरवात केली. तिचा राग भलताच अनावर झाला होता. काहीजणांनी तर तिचं ते रूप पाहून शिस्तीत घरची वाट धरली. मीही एका झाडाच्या मागे जाऊन लपलो होतो. सगळ थोडं शांत झाल्यावर ती जाताना बॉलही घेऊन गेली. तेव्हापासून परत कधी ती रस्त्यावरून जाताना दिसली की आमचा खेळ ती पूर्ण दिसेनाशी होईपर्यंत बंदच असायचा.

हा क्रिकेटचा किस्सा झाल्यानंतर साधारण दोन तिन आठवड्यांनी होळी होती. आम्हा सगळ्यांची होळीची तयारी चालली होती. होळीसाठी लागणारी लाकड, मैदानात होळीसाठी खड्डा, होळीची वर्गणी सगळ कसं जोरदार चालू होत. आता गरज होती ती होळी पेटवण्यासाठी लागणारा पेंढा आणि पेंढा मिळण्याची उत्तम जागा म्हणजे फसुबसच्या घराशेजारी असलेलं शेत. तिथे जवळच राहणाऱ्या एका शेतकऱ्याच ते शेत होत. पण तिथे जाऊन पेंढा आणायचा म्हणजे कर्मकठीण काम शिवाय फसुबस बऱ्याचदा तिच्या घराच्या दरवाजात मशेरी लावत बसलेली असायची. साधारण सायंकाळी पाच सहाची वेळ असल्यामुळे तसा उजेडच होता. कोणीही जायला तयार होत नव्हतं. पण पेंढा तर हवाच होता, शेवटी एकाला कसतरी तयार केला. त्याला सोबत म्हणून त्याच्या मागे मागे मीही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो आणि शेताच्या बांधावर जाऊन थांबलो. माझा मित्र शेतात पोहोचलाही, शेताच्या मध्यभागी पेंढ्याचा मोठा ढीग होता. मोकळ आवर असल्यामुळे थोडीशी हालचालही लक्षात आली असती. बाजूलाच फसुबसच्या घराजवळच्या झाडावरही पेंढा होता, आणि तिथून तो काढण तसं सोपं होत. माझा मित्र झाडाजवळ जाणार तोच फसुबस घरातून बाहेर आली. तिची समजूत झाली की हा पोरगा शेंगा काढण्यासाठी आला आहे. बाजूलाच पडलेली शेंगा काढायची काठी घेऊन ती त्याच्या मागे धावली आणि माझा मित्र जीव मुठीत घेऊन असकाही धावला की तो थेट त्याच्या घरी जाऊनच थांबला असेल. ती त्याचा पाठलाग करत शेताच्या मध्यापर्यंत आली होती. मी मात्र काहीच न समजल्यासारखा बांधावरच उभा होतो. ती लांबूनच मला हात दाखवून बोलावत होती. मला काय करू ते कळेना, काही दिवसांपूर्वी तिचा राग सगळ्यांनीच पहिला होता. मी घाबरतच शेतात उतरलो, ती मला घेऊन शेवग्याच्या झाडापाशी आली व झाडाकडे बघत म्हणाली की "बघ झाड कसा भरलाय शेंगानी" काढायच्या झाल्यात शेंगा. थांब देते तुला. तिने हातातल्या काठीने भराभर शेंगा पडल्या. शेंगांची जुडी माझ्याकडे देत ती म्हणाली "आजीला सांगा फसुबसने दिल्यात शेंगा". "हो हो सांगतो.... मी सांगेन" असं बोलत मी निघालो. तेवढ्यात तिने पुन्हा हाक मारली. मी मागे वळून पाहिलं तर ती घरात शिरली आणि बाहेर आली तेव्हा तिच्या हातात त्यादिवशी घेऊन गेलेला बॉल होता. आता मी एका हातात बॉल तर दुसऱ्या हातात शेंगांची जुडी घेऊन घरी परतलो.

तिच्याबद्दल लिहिताना ती काळजी घेणारी आहे असं मी म्हटलंय आणि त्याला कारणही तसंच आहे. ती बरीच वर्ष माझ्या शाळेच्या बाजूलाच रहायची त्यानंतर ती गावातच रोडला लागून असलेल्या एका चाळीत आली होती. मी सकाळी ऑफिसला जाताना दरवाज्यात मशेरी लावत बसलेली रोजच्या रोज मला दिसायची. त्याच रोडने जाताना स्टेशनला जाण्यासाठी एक रेल्वे ट्रक क्रॉस करावा लागतो आणि हे तिलाही माहिती होत. मी जेव्हा तिला सकाळी दिसायचो तेव्हा "बाबा क्रॉस करताना गाडी बघ हो... एक नंबरची गाडी दिसत नाय.... गाडी बघून जात जा रे...." असं ती सांगायचीच. हि गोष्ट मला घरातलेही सांगायचे पण असंख्य वेळा फसुबसने सांगितली असेल. सगळ्यांची काळजी करणाऱ्याची काळजी घेणारा कोणीतरी असतो असं म्हणतात पण ते किती खर आहे हे तर देवच जाणे. एखाद दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तिच्या घरात चोरी झाल्याच मला कळलं होतं. कोणीतरी काळजात हात घालावा अशी माझी अवस्था झाली होती. तिच्या घरात चोराण्यासारखी वस्तू सापडणच कठीण. काही पैसे मिळाले असतीलही त्यांना पण इतक्या मेहनतीचे आणि थेंब थेंब रक्त आटुन कमावलेल्या त्या पैशांवर इतर कोणाचा हक्क असणे शक्यच नव्हता. ती शिदोरी गमावल्यामुळे तिचे मन किती कळवळले असेल याचा अंदाज बांधता येत नव्हता. आयुष्यभर कण कण जोडून कमावलेली शिदोरी अशी एका क्षणात गमावल्यानंतर सारं आयुष्याच हरवल्याचा भास तिला झाला असेल. मनातलं कोणाला सांगायचं तर जवळ कुणीच नाही. पण देवाला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे देवाने चोरांना त्यांनी कोणाकडे चोरी करावी हा विचार करण्याची बुद्धी द्यावी. कष्ट करणाऱ्यांची मने कणखर असली तरी ती तितकीच हळवी सुद्धा असतात. फसुबसही त्याहून काही निराळी नव्हती. सगळीच्या सगळी दुखं मनाच्या मातीत गाडून ती त्यातूनच जगण्याचं नवं रोप लावते. स्वतःशीच खंबीर आणि जगण्याशी एकनिष्ट असलेल्या लोकांमध्ये तिचा सगळ्याच वरचा नंबर लागतो. तिची जगण्याची पद्धत आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतरांपेक्षा बराच वेगळा आहे. इतके होऊनही ती खचली नव्हती आणि पुन्हा नव्या उमेदीने जगण्याचा तिचा खटाटोप लगेचच चालू झाला होता.

एक एक कण व क्षणाला क्षण जोडून जगण्यात काय मजा असते हे तिने जाणल होत. कष्ट करणारा माणूस खूप श्रीमंत असेलच असे नाही, पण तो समाधानी आणि सुखी असतो हे फसुबसला पाहिलं की लक्षात येत आणि त्यावरचा विश्वासही दृढ होतो. लहानपणापासून पाहत आलो आहे तिला अजूनही अगदी तशीच कामात गुंतलेली, कायम स्वतःमध्ये हरवलेली, कामानंतर शरीराने थकत असेल पण मनातून समाधानी, चेहऱ्यावरचा निरागसपणा अजूनही तसाच. तिला आताही पाहिलं की मी अजूनही लहान असल्याचाच भास होतो. असं साधं पण तितकंच खडतर आयुष्य तिच जगू शकते. आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हा विचार तिला बघून नेहमी माझ्या मनात येतो. कोणत्याही गोष्टीची तक्रार करणे तिला कधी जमले नसेल. जे आयुष्यात आलं ते आपल मानून जगली. तिला स्वतःला कसं जगणं हवं आहे हे तर तिच जास्त चांगलं जाणत असेल. पण मला विचारलं तर मी सांगेन की अजून वीस तिस वर्षांनीही ती मला रस्त्यात भेटल्यावर साडीच्या ओटीतून काढलेला खाऊ हातावर ठेऊन तशीच गोड हसावी...

Friday, July 15, 2011

रोजसारखा दिवस आणि रोजसारखीच धावपळ ???

रोजसारखा दिवस आणि रोजसारखीच धावपळ
आज तरी लवकर घरी जाऊ मनाला एकच कळकळ

मेंदू बधीर करणाऱ्या त्या आवाजाने
लोकलची announcement ऐकूच आली नाही
नजरेसमोर दिसली लोकल पण
घरची वाट गवसलीच नाही

का घडले असे कळण्याआधीच काहीजण
त्या वास्तवाचे निर्जीव साक्षीदार बनले
सजीवांना मात्र हळहळ व्यक्त
करण्याशिवाय दुसरे काहीच नाही जमले

रक्ताचा पाट पाण्यासारखा नुसता घळघळ वाहिला
खाकी गणवेशातला बुजगावणा साला सगळ बघतच राहिला

दोन दिवसांची चर्चा आणि
दोन दिवसांच्या ह्या सांत्वन भेटी
बऱ्याच ठिकाणी पेरले असतील विस्फोट अजून
केवळ पेटवायच्या असतील वाती

डोकी गहाण टाकलेल्या ह्या महारथीमुळे
ओरबाडला गेलाय प्रत्येकजण

स्वत:सारख्याच इतरांना मातीत मिसळून
स्वत:साठी हवं आहे ह्यांना समृद्ध जीवन

रोजसारखा दिवस आणि रोजसारखीच धावपळ...........

Sunday, May 22, 2011

भिजलेला २६ जुलै...

पावसाळा म्हटलं की तसे सगळेच मनातून ओले आणि प्रसन्न होतात. पावसाचा Fanclub Open केला तर नागड्या मुलापासून तो मिशी पिकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत सगळेच त्याचे Fan असतील. लहानांना तर water bottle मधलं पाणी कपड्यांवर सांडलं की जमत नाही पण हेच जर पावसात भिजून ओल्या uniform मध्ये बसायला जमत. मोठेही तसे काही फार मागे नाहीत, घड्याळाचे काटे आणि Railway timing तंतोतंत जुळलं नाही की Indian Railway ला शिव्या घालणारे पावसाळ्यात मात्र Railway चा track पाण्यात किती बुडालाय हे पाहण्यात तासोनतास गाडीत पडून राहतील. तसा किती नाही म्हंटला तरी पाऊस सगळ्यांच हवासा वाटतो. पण एक दिवसं असा होता त्या दिवशी तो बऱ्याच जणांना नकोसा झाला होता.

College मधून visit साठी मुलुंडच्या एका mall मध्ये आलो होतो. पाऊस तसा पहाटेपासूनच पडत होता. ११ वाजेपर्यंत सगळ्यांनीच mall गाठला. कृष्णा बरोबर होते. तासभर हुंदडून काय करायची ती visit केली. ठरवून पडल्यासारखा पाऊस कोसळतच होता. सर थोडे काळजीत होते, 'अरे पोरानो पाऊस पडतोय लवकरच घरी पळा'. सरांचे ऐकू, इतके आज्ञाधारक आम्ही कधीच नव्हतो. सर तर निघाले पण पोरांना shopping ची खाज आली होती.सगळ्यांनी आपापल्या दुकानांच्या वाटा धरल्या. बाहेर कसाला तरी गोंधळ ऐकून आमच्यातला एकाने mall मध्ये पाणी शिरलंय असा शोध लावला. सगळेच बाहेर आले आणि आधी धाव ठोकली ती पहिल्या मजल्यावर. सुरुवातीला अरे पाणी .. पाणी ... असं करत गंमत चालली होती, पण वेळीच बाहेर पडलो नाही तर आतच अडकू हे कळल्यावर गुमान सगळे साठलेल्या पाण्यातून वाट काढत रोडवर आलो. रोडवर सुधा नदी झाली होती. सगळेच थोडे विचलित झाले होते. हा काय प्रकार आहे ? हा सगळ्यांनीच मनाला विचारलेला प्रश्न होता. लगेचच सगळ्यांची एक meeting झाली, एकमताने एक निर्णय घेण्यात आला. त्यातल्या त्यात त्या ठिकाणापासून प्राजक्ता आणि निकिताच घर जवळ होत. मग काय ... अर्धी पलटण प्राजक्ताकडे व अर्धी निकीताकडे, दोन मोर्चे दोन दिशांना निघाले होते. प्रथम आम्ही Taxi, auto ने जाण्याचा विचार केला. अपयश हि यशाची पहिली पायरी असते. हे वाक्य सार्थ करत आम्ही Taxi, auto वैगरे मिळवण्यात अपयशी ठरलो होतो. बसेस तर overflow झाल्या होत्या. बिचारा कन्डकर आत गुदमरून जायची वेळ आली असेल त्याच्यावर. बस जगाची हलत नव्हती आणि आत बसलेली लोकं सुधा. वरून पाऊस जोरदार कोसळत होता. एका छत्रीत तीन चार जण कोंबून आमचा मोर्चा हळूहळू पुढे चालला होता. बाजूचे दोन जण तर पार भिजत होते तरी छत्रीत डोकं खुपसलेलच. कसेबसे मुलुंड चेकनाक्यापर्यंत आलो. आमच्या मोर्च्यामध्ये मी, अजित, अमित, सुप्रिया, खुशबू, जान्हवी आणि निकिता असे सात धडाडीचे कार्यकर्ते होतो. आमच्यातला सगळ्यात उत्साही कार्यकर्ता अजित ह्याला कसली तरी आठवण झाली होती ... शिव्यांचा आलाप घेत त्याच गाणं चालू झाल होत. त्याने त्याची bike mall च्या पार्किंग मध्ये ठेवली होती आणि आता पार्किंग पाण्याखाली होतं. परत जाण्यात काही point नव्हता. हातात हेल्मेट नाचवत त्याने त्याचा सुपीक डोक्यातून एक idea काढली होती. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या वडिलांच्या कारखाना जवळच आहे . तिकडून कर घेऊन आपण काराने मुक्काम गाठूया असा ठराव मंजूर झाला. ह्या ठरावामुळे सुप्रियाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. चालून चालून पार वैतागून गेली होती. आता गाडी आणण्यासाठी अजित आणि मी निघालो बाकीचे तिथेच आराम फार्मावणार होते. कारखान्यात आल्यावर मेन गेटला कुलूप होत. गेट ओलांडून आत आलो गाडीचा पत्ता नव्हता पण कोपऱ्यातली सायकल आम्ही उचलली. अजितने त्याचे मुकुट (हेल्मेट) डोक्यावर चढवले. मी मागे छत्री घेऊन. आमची जय विरूची जोडी निघाली चेकनाक्याला. आमचा तो प्रकार एकूणच थोडा विचित्र होता. एकतर अजित हेल्मेट घालून सायकल चालवत होता मी मागे छत्री पसरून बसलो होतो. एकदम abstract painting झालं होत आमचं. त्या प्रकारामुळे सगळेच बऱ्याच वेळातून हसले होते.

संध्याकाळचे साधारण सहा साडे सहा वाजले निकिताच घर गाठायला. घरी लाईट नव्हते. maggi, jam bread, असा मेनू येताच त्याचा फडशा पाडण्यात आला. फोनच नेटवर्क नसल्याने घरी कळवणं शक्य नव्हतं. रात्रीचा मुक्काम इथेच आणि सकाळी आपापल्या घराकडे प्रस्थान, असे ठरले. पाऊस अजून थांबला नव्हता. दिवसभराच्या थकव्यामुळे सगळेच क्षणात आडवेही झालो. साधारण पहाटे ३:३० ला मला जागा आली. सहज पडदा सरकवून वातावरणाचा आढावा घेत होतो. गधड निळ्या रंगाचा प्रकाश, अधूनमधून चमकणारी वीज आणि पाण्याच्या थेंबांचा सर सर असा आवाज बस्स... एकूणच भयानक परिस्थिती तयार झाली होती. गपचूप पुन्हा चादर डोक्यावरून घेतली.

सकाळी आपापल्या घरी निघण्याच्या तयारीला जोर चढला होता. अजितने मला त्याच्या घरी येण्याची ऑफर दिली होती पण आजतरी घरी पोहचलो पाहिजे म्हणून मी माझ्या घरचाच रस्ता पकडला. ठाणे स्टेशन गाठले .... ट्रेन १००% बंद आणि बसेससाठी सिद्धीविनायाकापेक्षा मोठी रांग. आता रेल्वेचे स्लीपर्स मोजत track मधून चालत जाण्याचा मार्ग निवडला. कालचा दिवस सगळ्यांबरोबर असाच मजेत गेला होता आता एकटाच होतो. पण आज काही करून घर गाठायचं होत. घरी किमान एक फोन जरी लागला असता तरी थोड टेन्शन कमी झालं असतं. ह्या साठलेल्या पाण्यात तरी कसाबसा सावरलो असतो पण घरात काय चाललं असेल ह्या विचारात बुडून अगदीच गुदमरल्यासारख झालं होत. ठाणे ते डोंबिवली नेहमचा २० ते २५ मिनिटांचा प्रवास बराच मोठा वाटत होता. साडेबारा वाजले होते आणि पाठीवर bag सांभाळत मी ठाणे सोडले. एक एक स्लीपर्स मागे टाकत वेगात पायागडी चालू होती. मागे वळून बघितलं स्टेशनाचा तो पिवळा बोर्ड छोटासा दिसत होता. ३ ते ४ सेकंदात पार होणारा ब्रिज पार करायला पूर्ण ३ मिनिटे लागली. सगळं खूप लांब गेल्यासारख वाटत होत. track वरून continues चालत राहण तसं कठीणच. ५ मिनिटांचा ब्रेक घेतला. थांबल्यामुळे परत चालताना पाय जबरदस्त भरून आले होते. लांब तिकडे कळवा स्टेशन दिसत होते. थोडा हुरूप आला. आता एकाच गणित मी आणि स्टेशन ..फक्त अंतर तुडवायच होत. तरी कळवा स्टेशन यायला पाऊण तास खर्च झाला. आता मात्र दमाने छाती भरून आली, तसाच bag काढली आणि platform वर आडवा झालो. घराची गादी आठवली. ५ मिनीट तसाच डोळे मिटून पडून राहिलो. २० एक मिनिटांनी पुन्हा चालायला सुरुवात केली.

पुढचं स्टेशन होत मुंब्रा. लोकांची गर्दी आता जाणवत होती. समोर बरीच गर्दी दिसली काही लोकं चहा आणि बिस्कीट वाटत होते. एक पुडा मीही उचलला. आभार व्यक्त करत समोर दिसणाऱ्या भोगद्याकडे वळलो. भोगाद्यात गुडगाभर पाणी होत. भोगदा पार केल्यावर डाव्या हाताला असणारा रोड पूर्ण पाण्याखाली बाजूलाच असणाऱ्या लोकाच्या घरात पाणी जाऊन सगळं सामान बाहेर आलं होत. सगळेजण वर track वर येऊन बसले होते. डोळे फाडून मी ते दृश पहातच राहिलो. पाण्याचा असा कहर मी प्रथमच अनुभवला होता. प्रयत्न करून काहींनी आपलं अर्धमुर्ध समान वाचवलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंतेचं ग्रहण वाढतच चाललं होतं. प्रत्येकजण एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत होता. पावसाची विश्रांती संपली आता, पुन्हा जोराची सुरुवात झाली होती. अजून थोडं पुढे आल्यावर उजव्या हाताला लागून असलेल्या घरांमध्ये तीच परस्थिती होती. कालपर्यंत सुखात विसावलेली ती कुटुंब अचानक कोसळलेल्या पावसामुळे उघड्यावर आली होती. जमिनीत घट्ट रोवल्यासारखा मी तिथेच थांबलो होतो. आता मात्र घरच्यांची आठवण येत होती. घरी पोहोचायची घाई झाली. वीस मिनिटे चालल्यावर दुसरा भोगद्यापाशी आलो. ह्या ठिकाणी बऱ्यापैकी पाणी साठलं होतं. पाण्यात शिरलो, सुरुवातीलाच कमरेपर्यंत पाणी होतं. पायाखाली स्लीपर्सचा अंदाज घेत हळूहळू पुढे सरकत होतो. भोगद्याच्या मध्यभागी पाणी कामरेहूनवर आलं. आता bag डोक्यावर घेऊन चालण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. खाली पायांना track चा अंदाज येत नव्हता. त्याच वेळेला पैशाचं पाकीट आणि मोबाईल jeans च्या poket मधेच होते. घाई घाईने तसेच ओले पाकीट आणि मोबाईल bag उघडून त्यात कोंबले. दरम्यान पाय दोन स्लीपर्स मधल्या खोल जागेत पडला आणि पाणी थेट गळ्यापर्यंत आले. bag ही पाण्यात पडली. पटकन सावरून चालू पडलो. छातीची धडधड वाढली होती. कधी एकदाचा बाहेर पडतोय असं झालं होतं. भोगद्याचा शाप संपला होता. इकडे तर झोपड्यांची वाट लागली होती. चिखल, गाळ, मोडलेल्या भिंती आपला तो विखुरलेला संसार वेचण्याचा तो प्रयत्न बघतांना माझी त्या घरासारखी मोडकलीची अवस्था झाली होती. सगळं मागे सारत वीस मिनिटात मुंब्रा गाठलं. माझ्या उभ्या आयुष्य असं दृश्य मी कधीच पाहिलं नव्हतं ते त्या ब्रिजवरून मी त्यावेळी पाहिलं. मी ज्या ब्रिजवर होतो त्याखाली किमान ४० फुट खोल पाण्याची पातळी असते आज ती फक्त ४ ते ५ फुटांची होती. पाण्याची पातळी किती वाढली ह्याचा अंदाज करणंच कठीण होतं. अशा पाण्याच्या थैमानामुळे track मधून दिवा स्टेशन चालत जाण्याचा विचारच करवत नव्हता. परत मागे जाणे अशक्य होते. १० मिनिटे त्या ब्रिजवर मी तसाच उभा होतो. एक पाऊलही माझ्याने पुढे पडले नव्हते. आता एकाच मार्ग होता रोडने चालत जाण्याचा. मुंब्रावरून शिळफाटा, शिळवरून निळजे, निळजेवरून लोढा मग प्रीमियर कंपनी मग मानपाडा, डोंबिवली कोपर आणि मग घर असा लांबचा पल्ला होता. साधारण 15 ते 16 किलोमीटर अंतर. ह्या मार्गाने आजच्या दिवसात घरी पोहोचणे कठीण होते. पण मी एखाद कि.मी. चाललो असेल आणि तो पाण्याचा पसारा इकडेही तसाच होता एकदम DEAD END. सगळीकडे नुसती गर्दी, पाण्यात गाड्या अडकलेल्या सगळकाही विस्कटलेलं. हताश करणारी परिथिती. घर आठवत होत आई आठवत होती. घराकडे निघालो होतो पण घरापासून लांब आलो असं वाटत होतं. डोळ्यात थोडी जागा शिल्लक होती पण तीही आता पाण्याने घेतली होती. बाजूला असलेल्या हातगाडीवर टेकलो. शांत झालो, पावसाचा जोर तसाच कायम होता अंधारही वाढला होता. आजच्या आज घरी जाण्याचा माझा विचार त्या अंधारात नाहीसा होताना मी बघत होतो. थोड्या वेळासाठी डोळे मिटले, पुन्हा त्याच रेल्वेच्या ब्रिजवर आलो. ४:१५ वाजले होते आता जरी सुरुवात केली तरी ७ वा पर्यंत दिव्याला पोहचू असा अंदाज बांधून मी track मध्ये उतरलो.

आता मात्र कठीण मग निवडला होता. त्याला ३ करणे आहेत, एक मला पोहता येत नाही, दोन पाण्याचा प्रवाह जोरात होता आणि तिसरा लवकरच अंधार होणार होता. पायाखाली track चा अंदाज येत नाही म्हणून वर overhead ची wire बघत वाटचाल सुरु केली तर खरी, पण त्या वाहत्या पाण्यातून चलन जोखमीच होतं. पायात बूट सतत पाण्यात राहिल्याने त्याची अवस्था दयनीय होती. माझ्या जरा पुढे चार जणांचा ग्रुप होता. ते एकमेकांचे हात पकडून चालले होते. मीही त्यांना join झालो. पायातला बूट नीट करण्यासाठी मी त्याचा हात सोडला. ५ मिनिट थांबू व निघू पण त्या पाण्यात उभं राहण कठीण. अंधार वाढला होता. दिव्याला पोहचलो की मग ताईकडे जातो या विचाराने थोडा सुखावलो. ७:३० ला मी सतत कंबरभर पाण्यातून चालत दिवा स्टेशनाला आलो. पण इथेही निराशा, ताईकडे जाणे शक्य नव्हते. एक मजलाभर पाणी आता तर platform वर थांबण्याखेरीज उपाय नव्हता. पण सगळा platform भरलेला होता. वर ब्रिज चढून आलो सगळ पाणीमय. एक दोन माळे पाण्याखालीच वर टेरेस गच्च भरलेले. डोंबिवलीच्या दिशेने पहिले तर समुद्राचा भास झाला. दोन झाडांची शेंडे तेवढे दिसत होते. बाजूला express Train मध्ये शिरलो एक जागा होती रिकामी लगेचच जाऊन बसलो. किती वेळाने असा सुखाने विसावलो होतो. पाय जणू नाहीतच मला अशी जाणीव झाली. आजूबाजूला राहणारे उरल सुरलं समान पोटाशी कवटाळून platform वर आसरा घेत होते. पूर्ण अंधार झाला होता. दूर कोठेतरी कुणीतरी लावलेल्या मेणबत्त्या झीलामिलात होत्या. पाऊस थांबला होता आणि आकाशही मोकालं झाल होतं. चंद्राच्या निळसर प्रकाशात दूरवर हलणारे पाणी मनात भीती निर्माण करत होते. खिडकीतून माझं लक्ष्य एका लाकडी पेटीवरच्या उंदरावर गेले. पाण्यात भिजून तो नुसता कुडकुडत होता. त्या पेटीच्या चाहु बाजूला पाणी होते पण समोरच्या बाजूला ५ फुटांवर पायऱ्या होत्या. ते अंतर त्याच्यासाठी जास्त होते. किमान सात आठ वेळा त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केलाही. पण त्याला पेटीवर परतण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मारलेली उडी त्याची शेवटची असेल असे मला वाटले कारण लगेचच पेटीवर परतणारा तो उंदीर वरच वेळ झाला तरी पेटीवर परतला नव्हता. माझी नजर त्याला वर पायऱ्यांवर शोधात होती. पण तो कुठेच दिसला नाही. मात्र काही वेळाने तो मला त्या पेटीच्या कडेलाच तरंगताना दिसला. पाण्याने त्याचा घात केला होता. त्या छोटा उंदराप्रमाणे किती लोकांचाही घात झाला असावा. पाऊस थांबला खरा पण खाली पाण्याची पातळी वाढतच होती. त्या उंदराच्या नादात पाणी ट्रेन मध्ये एक फुट वर आलं होत. मला तो उंदीर आठवला, आपली गत अशीच होते की काय ? अंगावर कट आला. दोन सीट सोडून एक वरचा बर्थ रिकामा होता मी मोर्चा तिकडे वळवला. भिजल्यामुळे थंडीही वाजत होती, झोप लागत होती पण खाली पाण्याची वाढणारी पातळी निवांत पडू देत नव्हती. खालचा बर्थ जवळजवळ बुडालाच. एक एक मिनिट तासासारखा वाटत होता. मी २५ तारखेला घर सोडल्यापासून ते आत्तापर्यंत घरच्यांशी काहीच संबंध साधता आला नव्हता. आई चेहरा डोळ्यासमोर येत होता. वेडिपीसी झाली असेल ती तर. पूर्ण दोन दिवस बाहेर तेही अशा परिस्थितीत. घरात काय चाललं असेल? डोक्यात हजार प्रश्नांनी गर्दी केली होती. पुन्हा एकदा डोळे पाणावले होते. प्रयत्न करून देखील शांत होता येत नव्हते. इतकी वाईट वेळ मी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. आयुष्यात काही गोष्टी असतात, मग त्या चांगल्या असोत वा वाईट त्या विसरता येत नाहीत. हे दोन दिवस असेच आहेत कधीच न विसरता येणारे. मला पहाटेच्या वेळी थोडी झोप लागली. सहा वाजता मला ताडकन जाग आली. पाणी आता उरल नव्हत. track मध्ये देखील एखाद फुट पाणी होते.

थोडाही वेळ न गमावता bag घेऊन मी चालू पडलो. आजतर नक्की घर गाठू. डोंबिवली आणि दिव्याच्या साधारण मध्यावर एक शंकराचं मंदिर लागतं. मंदिरही अर्ध्याहून जास्त पाण्याखालीच होतं. आज देव स्वतः बुडाला होता. फटाफट अंतर कपात मी कोपरला येऊन पोहचलो. मनातून प्रचंड आनंदून गेलो होतो. इथून एका नाल्यावरून छोटा ब्रिज ओलांडून मी जवळ राहणाऱ्या आत्याकडे गेलो. बाजूच्या चाळीत गेलेलं पाणी काढण्यासाठी धावपळ चालू होती. आत्याकडे प्रथम ज्योत्स्नाने मला बघितलं व म्हणाली 'अरे सुन्या अवतार बघ कसा झालाय तुझा .... थांब पाणी आणते' . बाजूलाच आरश्यात चेहरा बघितला मीच घाबरलो. काळवंडलेला चेहरा, खोल आत गेलेले डोळे, विस्कटलेले आणि राकट केस ........ भयानक !! मी मनातच म्हटलं अवतार काय घेऊन बसलीस. कसा आलो इथपर्यंत ते माझं मलाच ठावूक.

आता मनावर वेगळंच दडपण होतं, घरी जाण्याचं. घरातल्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं. घरी काय चालू असेल? घरातले सगळे व्यवस्थित असतील का ? घराजवळ पाणी असेल का ? असेल तर किती? प्रश्नांची गर्दी वाढतच होती. काकांच्या घराजवळ आलो तर एक अजून धक्का त्यांच्या बिल्डींगचा एक भाग कोसळला होता व दुसरा कधीही कोसळण्याच्या अवस्थेत होता. तळमजला अजून पाण्याखाली होता. त्या ठिकाणाहून एक चढाव पार केला की माझं घर. तिथे पाणी नसणार याची खात्री होती पण लवकरात लवकर घर गाठायची घाई झाली होती. मी बिल्डींग खाली होतो. घर आता काही क्षणाच्या अंतरावर होते. मी माझ्या gallery त होतो. आई धावतच घरातून बाहेर आली तिच्या त्या व्याकूळ चेहऱ्यावरून माझी नजर हटतच नव्हती. ती धावत येऊन मला बिलगली, जोरात कवटाळून हुंदके देत तिने मला गट्ट आवळल होतं. रडून मोठे आणि लालबुंद झालेल्या त्या तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा अशा काही लागल्या की दोन दिवसात पाहिलेलं पाणी मला त्यासमोर कमी वाटू लागलं. बाबांच्या डोळ्यातली चमक त्यांच्या मनातले भाव सांगून गेली. एकूणच घरातले वातावरण हळूहळू नॉर्मल होत गेले. घरी आल्यामुळे मीही सुखावलो होतो.

अश्या ह्या भिजलेल्या २६ जुलैने मला कधीही न विसारणाऱ्या आठवणींच भल मोठ गाठोड दिलं आहे आणि त्याचा ओलावा अजूनही मला जाणवतोय ......

Thursday, May 19, 2011

चिंचेच झाड

माझ्या छोट्याश्या शाळेच्या छोट्याश्या ग्राउंडवर एक मोठ असं चिंचेच झाड होत. त्याचा पसारा बराच मोठा होता. ग्राउंडवर पडणाऱ्या सावलीमध्ये त्याचा वाटा मोठा असे. त्याचे खोड इतके मोठे होते की त्याला मिठी मारायची झाली तर तीघाचौघांना एकमेकांचे हात पकडून त्या भोवती उभे राहावं लागे. शाळेच्या मागच्याबाजूला बरीच झाडं होती. पण हे समोर असल्यामुळे ते सगळ्यांचे लाडके होते. जेव्हा झाडाला चिंच लागण्याचा हंगाम असायचा त्यावेळी सगळी मुलं त्यावर तटून पडलेली असायची. घरातून येताना कागदात मीठ बांधून आणायचे आणि मधल्यासुट्टीत चवीने चिंचा पाडून खायच्या हा कर्यक्रम ठरलेला असायचा. पूर्ण मधल्यासुट्टी चिंचा पाडण्यात जायची. सुट्टीची घंटा होताच पहिला दगड हातात घेऊन सुरु झालेला हा खेळ शेवटच्या घंटेपर्यंत चालायचा. आमच्या शाळेतल्या पाचसहा तासांचा जो काही वेळ असायचा त्यातला थोडातरी वेळ या झाडापाशी जायचा.

माझ्या वर्गात प्रसाद चव्हाण नावाचा माझा मित्र होता. माझ्यामते आमच्या सगळ्यांपैकी जास्त वेळ त्या झाडापाशी घालवला असेल तो प्रसादने. झाडावर दगडमारून चिंच पाडण्यात तो जामच माहीर होता. ते झाडं नसत तर प्रसादाचा बराचसा वेळ असाच वाया गेला असता. ते झाडं आणि प्रसाद एक वेगळाच समीकरण झालं होत जे आमच्या गणिताच्या सरानाही सोडवता आलं नसतं. चिंचेची कोवळी पानेसुधा खायला गोड लागतात, त्यामुळे चिंचा पडतांना पडलेली पानेहि खाल्ली जायची. चिंच खाल्ली की नंतर त्यातली चिंचुकाही भाजून खाल्ली जायची. पावसाळ्यात तर त्याच्या खालची बरीचशी जमीन कोरडीच रहायची त्यावरून त्याच्या विस्ताराची कल्पना येईल. त्या झाडाच्या चिंचेच तर मुलांना व्यसनच लागल होत. शाळेच्या वेळात शिक्षकांच्या भीतीने मुलांना झाडावर चढता येत नसे. त्यासाठी मुलं रविवारची सुट्टी साधत. तसं तर हे झाड वेगवेगळ्या तह्रेने आमच्या बरोबर असायचे. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे खाण्याचा दृष्टीने तर होताच, बाकी आम्ही खेळण्यासाठी मैदानात असायचो तेव्हा ते आमच्यापैकीच एक असायचे. सोनसाखळी खेळताना एखादा झाडामागे गेला की त्याला पकडणे कठीणच. सोनसाखळीचा तो वेढा पकडण्यासाठी आला की झाडामुळे त्यांना एकमेकांचे हात सोडावे लागत, आणि तीच वेळ साधून पाळायला मिळत असे. लपाचुपी खेळताना लपण्याची ती एक चांगली जागा होती. शाळेचे स्पोर्ट्स असले की त्याच झाडाखाली बसण्यासाठी गर्दी होत असे. क्रिकेट खेळतानासुधा झाडाच्या सावलीत फिल्डिंग करण्यासाठी आमची भांडण होत असत. पतंगाच्या मोसमात बरेचशे पतंग झाडावर अडकलेले असायचे. चिंच काढायला झाडावर चढलो की पतंगाची सुधा कमाई होत असे. शाळेच्या सगळ्याच मजल्यांवरून आणि सगळ्याच वर्गातून ते झाड दिसायचे झाडावर झालेली थोडीशीही हालचाल लगेचच लक्ष वेधून घ्यायची, असेच एकदा हिंदीच्या तासाला वर्गात असताना बाहेर झाडावर चढलेल्या एका मुलामुळे माझं सार लक्ष तिकडेच केंदित झाल होत. नावाला मी वर्गात बसलो होतो आणि ते आमच्या शिक्षिकेलाहि कळले होते. मग काय बाकीच्या उरलेला तास उभा राहूनच गेला.

आमची जवळ जवळ ११ वर्षे त्या झाडाच्या सानिध्यात गेली. माझे आई बाबा जवळचे नातेवाईक व काही जवळचे मित्र सोडले तर मला जास्त ओळखणारे ते झाड होते. १९९९ सुमार, ५ नोव्हेंबर पासून दिवाळीची सुट्टी लागणार होती. कुणी गावाला, कुणी मामाकडे तर कुणी बाहेर फिरायला प्रत्येकाचा वेगवेगळे प्लान होता. शाळा सुटली होती, सगळेच तोंडावर आलेली दिवाळीची सुट्टी अनुभवायला आसुसलेले होते.

दिवाळीचे वीस पंचवीस दिवस अगदी मजेत गेले. सुट्टीनंतरचा पहिला दिवस उजाडला होता. माझ्या घरातून शाळा दिसत असे, मैदानात एकाच गर्दी झाली होती. सहसा प्रत्येकजण आपापल्या वर्गाबाहेर उभे राहत पण आज मैदानात गर्दी का हे जाणण्यासाठी मीही उत्सुक होतो. सगळे मित्र भेटणार ह्या विचाराने मी धावतच मैदानात आलो. मी जसा मैदानात गेटजवळ आलो तो तसाच जागीच उभा राहिलो, काहीतरी हरवलं होत शाळेचा आवार मोकळा आणि भकास वाटत होता. वास्तव कळायला मिनिटभर लागला पण जेव्हा कळलं तेव्हा तो क्षण मनात व हृदयात धडकी भरवणारा होता. शाळेची सावली लोप पावली होती, लपाचुपी खेळतानाची माझी लपण्याची आवडती जागा हरवली होती. तासोनतास झाडाबरोबर रमणाऱ्या प्रसादाची दगड मारण्याची जागा त्याने गमावली होती. सावलीत फिल्डिंग करण्यासाठी भांडणाच कारण आता उरल नव्हत, सोनसाखळीचा तासभर चालणारा खेळ आता क्षणार्धात संपायचा. सगळ्यांचच आवडतं चिंचेच झाड तोडलं होत. खांद्यावरच दप्तर शाळेच्याच खांबाजवळ काढून ठेवत मी मुलांच्या घोळक्यात शिरलो, सगळ संपलं होत उरल होत ते फक्त जमिनीपासून एक दीड फुट वर आलेलं त्याच खोड आणि झाड तोडताना सर्वत्र उडालेले त्याचे शेकडो तुकडे. जरा वेळासाठी मला सगळाच खोट वाटत होत पण ते सगळ वास्तव होत. त्या मोकळ्या झालेल्या वातावरणातही माझी घुसमट होत होती. मी त्या घोळक्यातून बाहेर पडलो आणि माझ्या वर्गाकडे निघालो. न राहून मी ते दृश्य सारखे पहातच होतो. शाळेचा आवार आता फाटल्यासारखा वाटत होता.

त्याच दरम्यान एखाद दोन आठवड्यानंतर रोटरी क्लब तर्फे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी त्या तोडलेल्या झाडाला सगळेच विसरले होते. त्याच्या तोडलेल्या खोडाचीही अडचण झाल्याने ते खोदुन त्यावर माती टाकून ते सपाट करण्यात आले होते.


ते झाड कोणी, का व कशासाठी तोडले असे अनेक प्रश्न आपलं डोकं वर काढत होते. पण आता विचार करणे व्यर्थ होते. सुरुवातीचा एक महिना शाळेतून आत शिरताना त्या तुटलेल्या खोडाकडे माझं लक्ष हमखास जायचेच. ते झाड तोडल्यामुळे निसर्गाचा तर काही प्रमाणात नाश झालाच, पण त्याच बरोबर मुलांची मनेही तोडली गेली होती. कारण त्या झाडाची मूळ सगळ्यांच्याच मनामध्ये खोलवर रुजली होती. वर्गात बसल्यावर आता मोकळा पण खायला उठणारा परिसर दिसत असे. आता बरेच आठवडे सरले ती मला वर्गात बसल्यावर कायम एक मित्र गैरहजर असल्याचा भास होत होता. शाळेच्या हजेरीपाटावर सगळी मुलं हजर असतं पण माझ्या मनाच्या हजेरीपटावर एकजण कायम गैरहजरच होता ...........