Monday, November 21, 2011

फसुबस

तसं तर ती वयाने माझ्या आजीच्या वयाची आहे. पण तीचा संबंध लहान मुलांशी जास्त येतो. लहान मुलांची तेलाने मालीश करतात त्यासाठी ती प्रसिद्ध आहे. माझीही मालीश तिनेच केली आहे. म्हणजे मी जन्मल्यापासून ती मला ओळखते. जगात खूप कमी लोक अशी असतात की ज्याचं आपल्याशी रक्ताचं नात नसतं, तरीसुद्धा ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यापैकी एक फसुबस आहे. मानलं की तिचं नाव जरा विचित्र आहे आणि मलाही तसं वाटत. पण फसुबस हे नाव कसं आलं त्यामागे तिचं मूळ नाव कारणीभूत आहे. 'फसाबाई' हे तिचं मूळ नाव. कारण जुन्या लोकांना उगाचच चांगल्या नावाची मोडतोड करून नवीन नाव ठेवण्याची सवय असते. त्यामुळे 'फसाबाई'च 'फसुबस' झालं असावं असा माझा अंदाज आहे. तीच नाव फसाबाई आहे हे मलाच बऱ्याच वर्षांनी कळले. माझ्या लहानपणापासून मी तर तिला फसुबस याच नावाने ओळखतोय.

बरीच माणसं असतात जी आपल्याला रोज दिसतात. उदा. शाळेतले शिक्षक, मित्र, शेजारी इ. पण माझ्या ह्या नावांच्या यादीत फसुबस हे नाव सुधा आहे. ती मला अगदी शाळेत असल्यापासून ते आता ऑफिसला जाणे चालू झाले तरी ती रोज दिसते. तशी ती इतर वयस्कर बायकांसारखीच आहे तरी सगळ्यात वेगळी. एकतर तीच व्यक्तिमत्त्व थोडं हटके असं. वरवर पाहिलं तर अगदी सामान्य पण नीट निरखल तर बरेच पैलू गवसतील. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे तिचा पेहराव! एकदम भारदस्त!! गडद सावळा रंग, थोडासा खरखरीत तरीसुद्धा स्पष्ट आणि कडक आवाज, दात नसल्यामूळे तोंडाचा झालेला चंबू, थोडाफार सुरकुतलेला चेहरा, नाकात नथ आणि भक्कम अशा शरीरावर काष्टा मारून नेसलेलं लुगड. तिची किंचित वाकून पण वेगात चालण्याची लबकही सगळ्यात वेगळीच. स्वभावाने तितकीच साधी, मनाने हळवी आणि काळजी घेणारी. भयंकर कष्टाळू, तरीसुधा चेहऱ्यावर कष्टाचे भाव शोधूनही सापडणार नाहीत. स्वतःसाठी तर सगळेच राबतात पण इतरांसाठी राबणारी फसुबस हि एकटीच.

एकंदरीत काय तर सगळ्यांसाठी वाहिलेल आयुष्य जगणारी फसुबस आधीपासून एकटीच राहते. माझ्या शाळेच्या बाजूलाच हाकेच्या अंतरावर तिचं घर होत. तिला एकटीला पुरेल असं छोटस कौलारू घर, बाहेरच एक लाल रंगाचा जुन्या पद्धतीचा थेंब थेंब पाणी गळणारा नळ, त्याखालीच काळ्या कड्प्प्याची तुटलेली व अर्धी मातीत रुतलेली लादी, घरात शिरताना वाकून आत जावे लागे. घरात सामानाच्या नावाखाली मातीची पण शेणाने सारवलेली सुबक अशी चूल, सहज मोजता येतील इतकी दहा वीस भांडी, कथ्यामध्ये विणलेली एक लाकडी खाट त्यावर ठिपक्यांची घरात विणलेली गोधडी, तिच्या नेहमीच्या वापरातील थोडं सामान, एक जुनाट असं कपाट आणि दोन तीन वेताच्या टोपल्या. तिच्या त्या छोट्याश्या घरातून एका चिंचेच्या झाडाने आपला संसार मांडला होता. त्याचे खोड घराच्या एका कोपऱ्यातून वर कौलातून बाहेर निघाले होते. त्या छोट्याश्या घरात तिने त्यालाहि जागा दिली होती. त्या 10x10 च्या खोलीत दिवसाही अंधारच असायचा, एक पिवळट बल्प होता खरा पण तो संध्याकाळी सात वाजल्यानंतरच लुकलुकायाचा. दिवसा उजेडासाठी कौलातून डोकावणारे दोन तीन कवडसे आणि देवघरातील दिवा. जो सतत तेवत असायचा. असं तिचं छोटस पण नीटनेटक घर. पण त्या घरात आराम करण्यासाठी तिला कधी वेळच नसायचा, कायम कुठेतरी कोणाकडेतरी तिला बोलावलं जायचं. कुणाकडे बारसं, लग्न, हळद आणि सगळ्या कामात असायची आणि महत्त्वाच म्हणजे लहान मुलांची मालिश. सतत कुठेतरी अडकलेली असायची. पण ती न चुकता दिसायची अशी जागा म्हणजे माझी शाळा. शाळेतल्या मैदानाच्या एका कोपऱ्यावर बसून ती चिंच, हळद मिठात उखडलेल्या भुईमुगाच्या शेंगा आणि बोर विकायची. सगळी मुलंदेखील रोज रोज घरच आणि शाळेत मिळणाऱ्या जेवणाला कंटाळून त्या चटपटीत खाण्यासाठी तिच्याभोवती गर्दी करायची. ती भरलेली टोपली रिकामी व्हायला काही मिनिटांचा अवधी लागायचा. तसं तर ती माझ्या आजीला चांगली ओळखायची, आणि आमच्या घरीही बऱ्याचदा यायची. त्यामुळे शाळेतही इतक्या मुलांच्या गर्दीतही ती मला सहज ओळखायची. जर कधी मी पैसे देऊन काही घ्यायला गेलो कि ती पैसे न घेताच मुठभर बोर नाहीतर चिंच माझ्या हातावर टेकवायची आणि माझे सगळे मित्र आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहायचे. मी खुपदा प्रयत्नही केला पैसे देण्याचा पण काहीच उपयोग नव्हता. त्यानंतर मी मित्रांकडे पैसे देऊन तिच्याकडून चिंच किंवा शेंगा विकत घ्यायचो. असंच एकदा शाळा सुटल्यावर ती मला रस्त्यात भेटली होती. तिच्या हातात टोपली तर दिसत नव्हती, पण तिच्या साडीमध्ये थोडफार समान राहील असा एक कप्पा बनलेला असायचा. त्या कप्प्याला जुनी लोकं "ओटी" असं म्हणतात. त्यातून तिन मला चार पाच चिंच काढून दिल्या. मी काही बोलायच्या आधीच "घे घे..... खाऊ घे...." असं बोलून गोड हसली. ती असं जपून ठेवलेला खाऊ वाटून तिला काय मिळत असेल याचा विचार मी अजूनही करतोय. हल्लीचीच गोष्ट आहे, ऑफिसला जात असताना सकाळीच ती समोरून चालत येताना मला दिसली. मला पाहून ती थांबली आणि तिचा हात साडीच्या कप्प्याकडे गेला आणि मला जे समजायचे होते ते मी समजलो. तिने दोन पेढे काढून माझ्या हातावर ठेवले आणि तशीच गोड हसली!! जरा वेळासाठी मला पुन्हा शाळेत असल्याचा भास झाला. इतक्या वर्षानंतरही ती जराही बदलली नव्हती.

मुलांप्रमाणे शाळेतल्या शिक्षकांनाही शेंगा आणि चिंचेची चटक लागली होती. कोणीतरी सरांना सांगितले होते कि ती आजी सुनितला ओळखते म्हणून. तेव्हा सरांच्या सांगण्यावरून मी आणि मित्र तिच्याकडे शेंगा आणायला गेलो होतो. तेव्हा तीने नेहमीप्रमाणे पैसे न घेताच मुठभर बोर माझ्या हातात दिली. इकडे मित्राच्या तोंडाला पाणी सुटलं होत आणि मी म्हणालो "नको नको.... बोर वैगरे नको..." आमच्या सरांना शेंगा हव्या आहेत. तिला खरे वाटेना!! "मी पैसे नाही घेत म्हणून नाही घेत न बोर" ती म्हणाली. माझा मित्रही तिला समजावत होता "अहो आजी खरोखर आमच्या सरांनाच शेंगा हव्या आहेत". पण सुनितला दिलेली बोर फ्री असतील तर तीही चालतील. माझा मित्र वाटेल ते बडबडत होता. शेवटी तिची समजूत काढल्यानंतर तिने पैसे घेऊन शेंगा दिल्या खऱ्या पण हातात भरलेली बोर परत घ्यायला ती काही तयार नव्हती आणि ती भरलेली मुठ आवळून मी तसाच शाळेत परतलो. मागे वळून बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर तिचं ते गोड हास्य उमटलं होत आणि मीही ती मनातून आनंदित झालो होतो.

घरातल्या जवळ जवळ सगळ्याचा कार्यक्रमांना फसूबसची हजेरी असतेच. हजेरी असते बोलण्यापेक्षा तिला हक्काने बोलावले जाते. बरीचशी महत्त्वाची कामे तिच्या हातूनच होतात. लहान मुल जन्मल्यानंतर पाच दिवसांनी त्याला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम असतो त्याला "पाचवी" असं म्हणतात. त्यादिवशी तांदळाच्या पिठाची आणि गुळाची एक डिश बनवली जाते. तसं तर ही डिश बनायला एकदम सोपी पण खूप चविष्ट असते आणि त्यात फसूबसने बनवली असेल तर त्याची चव काही औरच असते. मी तर तिने बनवलेली ही डिश खाण्यासाठी म्हणूनच ह्या कार्यक्रमाला हजेरी लावायचो बाकी कार्यक्रमात नक्की काय होत ते अजूनही मला माहिती नाही. असाच एक पदार्थ जो लग्नकार्यात बनवला जातो तो म्हणजे "पोळा' आणि "पापडी". हे सगळे बनवण्याची जिम्मेदारी तिचीच असते आणि ह्या सगळ्या गोष्टींची नाळ थेट फसूबसशी जोडली जाते. ती नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी मलातरी अर्धवट असल्यासारख्या वाटतात. लग्नघरात तर फसूबसच्या नावाचा नुसता जपच चालू असतो.

तिच्या असंख्य आठवणी सांगता येतील. पण त्यातल्या त्यात माझ्या चांगल्या लक्षात राहिलेल्या एकदोन गमतीदार आठवणी.

माझ्या बिल्डींच्या समोरच्या मैदानात आमचा क्रिकेटचा खेळ रंगायचा. असंच एकदा आमचा खेळ सॉलिड रंगला होता. आमच्यापैकी एका तेंडुलकरने जोरदार बॉल मारला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या फसूबसला लागला. तो तिला मजबूत जोरात लागला असावा कारण लागल्यानंतर ती अशीकाही वैतागली की रागाच्या भरात तिने जोरजोरात बडबडायला सुरवात केली. तिचा राग भलताच अनावर झाला होता. काहीजणांनी तर तिचं ते रूप पाहून शिस्तीत घरची वाट धरली. मीही एका झाडाच्या मागे जाऊन लपलो होतो. सगळ थोडं शांत झाल्यावर ती जाताना बॉलही घेऊन गेली. तेव्हापासून परत कधी ती रस्त्यावरून जाताना दिसली की आमचा खेळ ती पूर्ण दिसेनाशी होईपर्यंत बंदच असायचा.

हा क्रिकेटचा किस्सा झाल्यानंतर साधारण दोन तिन आठवड्यांनी होळी होती. आम्हा सगळ्यांची होळीची तयारी चालली होती. होळीसाठी लागणारी लाकड, मैदानात होळीसाठी खड्डा, होळीची वर्गणी सगळ कसं जोरदार चालू होत. आता गरज होती ती होळी पेटवण्यासाठी लागणारा पेंढा आणि पेंढा मिळण्याची उत्तम जागा म्हणजे फसुबसच्या घराशेजारी असलेलं शेत. तिथे जवळच राहणाऱ्या एका शेतकऱ्याच ते शेत होत. पण तिथे जाऊन पेंढा आणायचा म्हणजे कर्मकठीण काम शिवाय फसुबस बऱ्याचदा तिच्या घराच्या दरवाजात मशेरी लावत बसलेली असायची. साधारण सायंकाळी पाच सहाची वेळ असल्यामुळे तसा उजेडच होता. कोणीही जायला तयार होत नव्हतं. पण पेंढा तर हवाच होता, शेवटी एकाला कसतरी तयार केला. त्याला सोबत म्हणून त्याच्या मागे मागे मीही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो आणि शेताच्या बांधावर जाऊन थांबलो. माझा मित्र शेतात पोहोचलाही, शेताच्या मध्यभागी पेंढ्याचा मोठा ढीग होता. मोकळ आवर असल्यामुळे थोडीशी हालचालही लक्षात आली असती. बाजूलाच फसुबसच्या घराजवळच्या झाडावरही पेंढा होता, आणि तिथून तो काढण तसं सोपं होत. माझा मित्र झाडाजवळ जाणार तोच फसुबस घरातून बाहेर आली. तिची समजूत झाली की हा पोरगा शेंगा काढण्यासाठी आला आहे. बाजूलाच पडलेली शेंगा काढायची काठी घेऊन ती त्याच्या मागे धावली आणि माझा मित्र जीव मुठीत घेऊन असकाही धावला की तो थेट त्याच्या घरी जाऊनच थांबला असेल. ती त्याचा पाठलाग करत शेताच्या मध्यापर्यंत आली होती. मी मात्र काहीच न समजल्यासारखा बांधावरच उभा होतो. ती लांबूनच मला हात दाखवून बोलावत होती. मला काय करू ते कळेना, काही दिवसांपूर्वी तिचा राग सगळ्यांनीच पहिला होता. मी घाबरतच शेतात उतरलो, ती मला घेऊन शेवग्याच्या झाडापाशी आली व झाडाकडे बघत म्हणाली की "बघ झाड कसा भरलाय शेंगानी" काढायच्या झाल्यात शेंगा. थांब देते तुला. तिने हातातल्या काठीने भराभर शेंगा पडल्या. शेंगांची जुडी माझ्याकडे देत ती म्हणाली "आजीला सांगा फसुबसने दिल्यात शेंगा". "हो हो सांगतो.... मी सांगेन" असं बोलत मी निघालो. तेवढ्यात तिने पुन्हा हाक मारली. मी मागे वळून पाहिलं तर ती घरात शिरली आणि बाहेर आली तेव्हा तिच्या हातात त्यादिवशी घेऊन गेलेला बॉल होता. आता मी एका हातात बॉल तर दुसऱ्या हातात शेंगांची जुडी घेऊन घरी परतलो.

तिच्याबद्दल लिहिताना ती काळजी घेणारी आहे असं मी म्हटलंय आणि त्याला कारणही तसंच आहे. ती बरीच वर्ष माझ्या शाळेच्या बाजूलाच रहायची त्यानंतर ती गावातच रोडला लागून असलेल्या एका चाळीत आली होती. मी सकाळी ऑफिसला जाताना दरवाज्यात मशेरी लावत बसलेली रोजच्या रोज मला दिसायची. त्याच रोडने जाताना स्टेशनला जाण्यासाठी एक रेल्वे ट्रक क्रॉस करावा लागतो आणि हे तिलाही माहिती होत. मी जेव्हा तिला सकाळी दिसायचो तेव्हा "बाबा क्रॉस करताना गाडी बघ हो... एक नंबरची गाडी दिसत नाय.... गाडी बघून जात जा रे...." असं ती सांगायचीच. हि गोष्ट मला घरातलेही सांगायचे पण असंख्य वेळा फसुबसने सांगितली असेल. सगळ्यांची काळजी करणाऱ्याची काळजी घेणारा कोणीतरी असतो असं म्हणतात पण ते किती खर आहे हे तर देवच जाणे. एखाद दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तिच्या घरात चोरी झाल्याच मला कळलं होतं. कोणीतरी काळजात हात घालावा अशी माझी अवस्था झाली होती. तिच्या घरात चोराण्यासारखी वस्तू सापडणच कठीण. काही पैसे मिळाले असतीलही त्यांना पण इतक्या मेहनतीचे आणि थेंब थेंब रक्त आटुन कमावलेल्या त्या पैशांवर इतर कोणाचा हक्क असणे शक्यच नव्हता. ती शिदोरी गमावल्यामुळे तिचे मन किती कळवळले असेल याचा अंदाज बांधता येत नव्हता. आयुष्यभर कण कण जोडून कमावलेली शिदोरी अशी एका क्षणात गमावल्यानंतर सारं आयुष्याच हरवल्याचा भास तिला झाला असेल. मनातलं कोणाला सांगायचं तर जवळ कुणीच नाही. पण देवाला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे देवाने चोरांना त्यांनी कोणाकडे चोरी करावी हा विचार करण्याची बुद्धी द्यावी. कष्ट करणाऱ्यांची मने कणखर असली तरी ती तितकीच हळवी सुद्धा असतात. फसुबसही त्याहून काही निराळी नव्हती. सगळीच्या सगळी दुखं मनाच्या मातीत गाडून ती त्यातूनच जगण्याचं नवं रोप लावते. स्वतःशीच खंबीर आणि जगण्याशी एकनिष्ट असलेल्या लोकांमध्ये तिचा सगळ्याच वरचा नंबर लागतो. तिची जगण्याची पद्धत आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतरांपेक्षा बराच वेगळा आहे. इतके होऊनही ती खचली नव्हती आणि पुन्हा नव्या उमेदीने जगण्याचा तिचा खटाटोप लगेचच चालू झाला होता.

एक एक कण व क्षणाला क्षण जोडून जगण्यात काय मजा असते हे तिने जाणल होत. कष्ट करणारा माणूस खूप श्रीमंत असेलच असे नाही, पण तो समाधानी आणि सुखी असतो हे फसुबसला पाहिलं की लक्षात येत आणि त्यावरचा विश्वासही दृढ होतो. लहानपणापासून पाहत आलो आहे तिला अजूनही अगदी तशीच कामात गुंतलेली, कायम स्वतःमध्ये हरवलेली, कामानंतर शरीराने थकत असेल पण मनातून समाधानी, चेहऱ्यावरचा निरागसपणा अजूनही तसाच. तिला आताही पाहिलं की मी अजूनही लहान असल्याचाच भास होतो. असं साधं पण तितकंच खडतर आयुष्य तिच जगू शकते. आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हा विचार तिला बघून नेहमी माझ्या मनात येतो. कोणत्याही गोष्टीची तक्रार करणे तिला कधी जमले नसेल. जे आयुष्यात आलं ते आपल मानून जगली. तिला स्वतःला कसं जगणं हवं आहे हे तर तिच जास्त चांगलं जाणत असेल. पण मला विचारलं तर मी सांगेन की अजून वीस तिस वर्षांनीही ती मला रस्त्यात भेटल्यावर साडीच्या ओटीतून काढलेला खाऊ हातावर ठेऊन तशीच गोड हसावी...